संगमेश्वर : तालुक्यातील तुरळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्री प्रशांत यादव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी रात्री बाचाबाची झाली. या बाचाबाची प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात शेखर निकम यांच्या पीए सह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश ब्रीद, अमित सुर्वे (पी ए शेखर निकम), पिंट्या पाकळे, उमेश राजेशिर्के अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 4 जणांची नावे आहेत. याबाबची फिर्याद जितेंद्र चव्हाण यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात काल शुक्रवारी रात्री प्रशांत यादव – शेखर निकम समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांना डीवचण्याचा प्रयत्न झाला आणि यातूनच दोन्ही गटात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळताच गस्तीला असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समजावत मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जितेंद्र चव्हाण यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसत सिद्धेश ब्रीद, शेखर निकम यांचे स्विय सहाय्यक अमित सुर्वे, पिंट्या पाकळे, उमेश राजेशिर्के अशा 4 जणांविरोधात BNS 2023 चे कलम 131,115(2), 352, 351(2), 324(2), 3(5) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.