संगमेश्वर : निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असताना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारला आहे. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात काल शुक्रवारी रात्री प्रशांत यादव – शेखर निकम समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी रात्री संगमेश्वर विधानसभेचे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते घरोघरी फिरत होते. दरम्यान तुरळ येथे दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. एकमेकांना डीवचण्याचा प्रयत्न झाला आणि यातूनच दोन्ही गटात जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळताच गस्तीला असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समजावत मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर हा वाद शांत झाला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने वाद वाद मिटविण्यात यश आले.