आता हॉलमार्क शिवाय दागिने विकता येणार नाहीत
मुंबई : देशात आजही अनेक ठिकाणी हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जात आहेत. यासंदर्भात, सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आता 11 राज्यात हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. 23 जून 2021 पासून, हॉलमार्किंगचा नियम लागू झाला आहे, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 40 कोटी सोन्याचे दागिने हॉलमार्क केले गेले आहेत. सरकार देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टप्प्यात त्याची अंमलबजावणी करत आहे. भारत सरकार आता देशाच्या विविध भागात भेसळयुक्त सोन्याच्या दागिन्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम लागू करत आहे.
नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या वाढली
सरकार आता देशातील ज्वेलर्सच्या नोंदणीवर काम करत आहे. यामुळेच देशात नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या केवळ 34,647 होती, ती आता 1,94,039 झाली आहे. याशिवाय हॉलमार्किंग केंद्रांची संख्याही 945 वरून 1622 झाली आहे.
ॲपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकता
तुमच्याकडे हॉलमार्किंग असलेले कोणतेही दागिने असल्यास, परंतु ते योग्य हॉलमार्किंग आहे की नाही याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही बीआयएस केअर मोबाइल ॲपद्वारे ते ओळखू शकता. या ॲपचा वापर करून, ग्राहक हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळू शकतो. उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल किंवा बीआयएस मार्कच्या गैरवापराबद्दल त्याची तक्रार देखील नोंदवू शकतो. देशात बनावट दागिन्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हॉलमार्कबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं लोकांनी सोन्याची खरेदी करतना काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलं आहे. हॉलमार्किंग असल्यावरच सोन्याची खरेदी करावी असं सांगण्यात आलं आहे.