रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी स्वीकारल्यानंतर रुग्णांची सेवा करीत असतानाच रुग्णसेवेचे गांभीर्य ओळखून कर्मचारी नरेश जोशी यांनी मोठे औदार्य दाखवले. त्यांनी रक्तदान करत एका गरोदर महिलेचा जीव वाचवला. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागात एक गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान तिला ओ निगेटीव्ह रक्ताची आवश्यकता होती. जिल्हा रुग्णालयासह रेडक्रॉस या खाजगी रक्तपेढीतही या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. त्यानंतर रुग्णालयासह नातेवाईकांसह ओ निगेटीव्ह रक्त असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्याच्या बाहेरून आल्यामुळे महिलेच्या कुटुंबियांची रत्नागिरी शहरात फारशी ओळख नव्हती. त्यामुळे महिलेसाठी रक्त आणायचे कुठून? या विवंचनेत कुटुंबीय होते.
जिल्हा रुग्णालयात अपघात विभागात काम करणारे कर्मचारी नरेश जोशी यांना या घटनेची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. त्यांचाही रक्त गट ओ निगेटीव्ह असल्याने त्यांनी तात्काळ कुटुंबियांचा शोध घेत आपण रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान करून प्रक्रियेनंतर ते तात्काळ महिलेला उपलब्ध करून देण्यात येणार होते. त्यामुळे नरेश जोशी यांनी तात्काळ रक्तदान केले. त्यामुळे त्या महिलेला रक्त उपलब्ध झाले. जिल्हा रुग्णालयात सेवा करत असताना रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवणाऱ्या नरेश जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.