रत्नागिरी:-मुंबापुरीच्या रंगमंचावर गेली २ वर्षे अधिराज्य गाजवणारे निवळी येथील नवलाई नमन मंडळ बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पुन्हा मुंबापुरीत घेऊन जात आहे. येत्या २३ नोव्हेंबरला मुंबईत दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरमध्ये हे नमन रंगणार आहे.
नेहमीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या कामात मुंबईकर रसिकांचा ताण कमी करण्याचे काम करण्याची ताकद कोकणातील लोककलांमध्ये आहे. या नमन मंडळाचे गेली दोन वर्षे मुंबईत प्रयोग होत आहेत. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. येत्या २३ रोजी कलाप्रेमी सुनील डावल आणि संतोष आंबेकर यांच्या संकल्पनेतून सायंकाळी साडेसात वाजता हा प्रयोग होणार आहे. यामध्ये परशुरामाचा क्रोध (एकदंताची कथा) हा गण, तसेच नटखट शृंगारिक गौळण आणि कंसवध आदी विविध पौराणिक प्रसंग पाहायला मिळणार आहेत. हरिश्चंद्र रावणंग यांच्या दिग्दर्शनाखाली होणाऱ्या या प्रयोगाला मुंबईकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.