रत्नागिरी : दिवाळी सणाचे 15 दिवस उलटूनही एसटी कर्मचाऱ्याना अद्याप बोनस देण्यात आलेला नाह़ी. यामध्ये कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली असून लवकरात लवकर बोनस व सण उचलची रक्कम देण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत आह़े. दरम्यान शासनाकडून निवडणूक आयोगाकडे दिवाळी बोनस देण्यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आह़े.
एसटी कर्मचाऱ्याना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त 6 हजार रुपये बोनस व सणउचल स्वरुपात साडेबारा हजार रुपये दिले जातात़. यावर्षी राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने दिवाळी बोनस देण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत़. दरम्यान दिवाळी बोनसविना गेल्याने एसटी कर्मचाऱ्याकडून संतप्त प्रतिक्रीया देण्यात येत आह़े. आचारसंहिता लागणार हे शासनाला माहिती असताना बोनस देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात उशीर का करण्यात आल़ा. लाडकी बहिण योजनेचे पैसे अगावू देण्यात आले, असे असताना बोनसचा निर्णय का घेण्यात आला नाही असे प्रश्न विचारण्यात येत आहेत़.यावर्षी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एसटी प्रशासनाला आणि शासनाला विनंती पत्र पाठविण्यात आले होते. एसटी प्रशासनाच्या वित्त विभागाकडून यामध्ये दिरंगाई करत वेळेत प्रस्ताव शासनाकडे न पाठविल्याने दिवाळी बोनस निधी देणे शक्य झाले नाह़ी. यामुळे 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाल़ा. मुळातच अत्यंत कमी पगार असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 6 हजार रुपये दिवाळी बोनस भेट अत्यंत महत्वाची होत़ी.
सर्वसामान्यांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी घरचा सण सोडून ऐन दिवाळीत राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना बोनस न देवून शासनाने अन्याय केला असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आह़े. निवडणूक आचारसंहिता असली तरी शासनाने यातून मार्ग काढून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना बोनस रक्कम वितरीत करावी अशी मागणी आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आह़े.