रत्नागिरी:-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते जोमाने मैदानात उतरले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत.
रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत आणि चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्यासोबत प्रचारसभांमध्ये आणि गावभेट दौऱ्यांमध्ये सहभागी होत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, उपाध्यक्ष अभिषेक शिंदे आणि स्थानिक पदाधिकारी त्या त्या पक्षांच्या बरोबरीने मेहनत घेत आहेत.
युवा मोर्चाच्या प्रदेश स्तरावरून निर्देश दिलेल्या ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही युवा मोर्चा गावागावातील युवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून जबाबदारी असलेले युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन यांच्यासह डॉ. ऋषिकेश केळकर, अनिरुद्ध फळणीकर, अभिषेक शिंदे, राजापूरमध्ये स्वप्नील गोठणकर, समीर शिंदे, अरविंद लांजेकर, लांज्यात अजय गुरव, चिपळूणमध्ये संदीप भिसे, समीर पवार, संगमेश्वरमध्ये अजय गुरव, स्वप्नील सुर्वे, प्रथमेश धामणस्कर, पुष्कर शेट्ये यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले गेले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही हे कार्यक्रम येत्या दोन दिवसात घेतले जाणार आहेत.
भाजप युवा मोर्चाच्या मेहनतीची दखल भाजप नेते सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून घेतली गेली आहे, तसेच महायुतीच्या तिन्ही उमेदवारांनी युवा मोर्चाच्या कार्यक्रमांचे कौतुक करत सहकार्यासाठी आपापल्या सभांमधून आभार मानले आहेत. राज्यात पुन्हा एकदा मजबूत सरकार येण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.