नागरिक संतप्त : साडेतीन तास बसेस धरल्या रोखून
सिंधुदूर्ग:-जिल्ह्यात कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये चिरडल्याने एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. काल सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमाराला हि दुर्घटना घडली.
त्यांनतर जबाबदार एसटी अधिकारी वेळेत न आल्याने नागरिकांनी संतप्त होत बस वाहतूक रोखून धरली. एका बसवर किरकोळ दगडफेकही करण्यात आली.
महिलेच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातले पाच लाख रुपये जमवून मृत महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर कणकवली बस स्थानकातून एसटी बस मार्गस्थ झाल्या. या प्रकरणी दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचं निलंबन केलं जाईल अशी अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काल सकाळी कणकवली बसस्थानकाच्या फलाट क्रमांक चार वरील एसटी मागे घेत असताना व फलाट क्रमांक पाचवर एसटी लावत असताना या दोन एसटीच्या मध्ये चिरडल्याने फातिमा रियाज बोथरे (वय ३६, रा. मेहबूब नगर उंबर्डे, ता.वैभववाडी) या महिलेचा मृत्यू झाला. दोन फलाटामध्ये एक बस मागे येत होती. तर एक बस पुढे जात होती. या दोन बस मध्ये चिरडल्याने फातिमा बोथरे यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अपक्ष उमेदवार नवाज खानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिये सरपंच महेश गुरव आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत आगार व्यवस्थापक श्री. यादव यांना धारेवर धरले. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियांना जोवर पाच लाख रूपयांची भरपाई मिळत नाही. तसेच अपघाताला जबाबदार असलेल्या एस.टी. चालक आणि वाहकांचे निलंबन होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता.
दुपारी दोन वाजता प्रभारी विभाग नियंत्रक विक्रांत देशमुख कणकवली बसस्थानकात दाखल झाले. त्यानंतर चर्चेअंती एस.टी. अधिकाऱ्यांच्या मार्फत तातडीने पाच लाख रूपयांची भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले. त्याला मृत महिलेच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवली. तसेच एस.टी. महामंडळामार्फतही मृत महिलेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची ग्वाही श्री.देशमुख यांनी दिली. यानंतर कणकवली बसस्थानकातील आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता कणकवली बसस्थानकात खोळंबलेल्या सर्व बसेस मार्गस्थ करण्यात आल्या.