देवरूख:-शहरातील खालचीआळी येथे 25 फुट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला येथील तरूणांनी सुखरूप बाहेर काढत जीवदान दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
25 फुट खोल खड्ड्यात गाय पडली होती. हा प्रकार जवळच राहणाऱ्या बापु डिंगणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पाहणी केली असता गाय खड्डयात पडली असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वाडीतील काही तरुणांना मिळताच त्यांनी मतदतीसाठी धाव घेतली.
राकेश खवळे व निरंजन बेर्डे यांनी खड्ड्यात उतरून या गाईला दोरीने बांधले व इतरांनी दोरीच्या मदतीने गायीला सुखरुपपणे बाहेर काढले. या बचाव मोहिमेत यतिन खवळे, नाना डिंगणकर, दिलीप करंडे, जयंत चव्हाण, ओंकार डिंगणकर, यश सुवारे, निखील चव्हाण, सागर सावंत, भालेकर आदी नागरिक सहभागी झाले होते.