रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या म्हैस, रेडकाची योग्य काळजी न घेता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. ही घटना 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. सागर वसंत प्रभू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सागर प्रभू यांच्या मालकीची एक म्हैस व रेडकू 29 सफ्टेंबर 2024 रोजी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथून जात होते. यावेळी वाहनाची धडक लागून म्हैस व रेडकू जखमी झाले. त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता त्याच अवस्थेत त्यांना सागर प्रभू हे सोडून गेले, असा आरोप ठेवण्यात आला. दरम्यान वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या म्हैस, रेडकाचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर प्रभू विरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा कलम 11 (ज) (झ) नुसार गुन्हा दाखल केला.