रत्नागिरीतून तरुणीला ताब्यात घेत केले पालकांच्या स्वाधीन
देवरूख ; येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आई वडिलांनी शुक्रवारी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या तरुणीला देवरुख पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी संबंधित तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी 12 नोव्हेंबर रोजी देवरुख येथे कॉम्प्युटर क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने बेपत्ता असल्याची फिर्याद वडिलांनी देवरुख पोलिसात दिली होती. दरम्यान देवरुख पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत माहिती मिळवली. दरम्यान सायबर सेलच्या माध्यमातून या तरुणाचे लोकेशन रत्नागिरी येथे मिळाल्यानंतर देवरूख पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या तरुणीला ताब्यात घेत देवरूख येथे आणले. शुक्रवारी तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलीला रत्नागिरी येथील तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याबाबतची तक्रार देवरुख पोलीस ठाण्यात दिली. यानुसार या तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.