मुंबई:-प्रशासकीय स्तरावरून मिळणारी आवश्यक परवानगी न मिळाल्याने मनसेची रविवारी (१७ नोव्हेंबर) शिवाजी पार्कवर होणारी सभा रद्द करण्यात आली आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शुक्रवारी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा जाहीरनामा ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त घोषणा केली.
ते म्हणाले की, माझी १७ तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. कारण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत. सभेला परवानगी मिळाली नाही हे सत्य आहे. राजकारण आहे की नाही माहीत नाही. जे उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांचा दिवस निघून जातो. नियोजन करण्यासाठी संधी मिळाली असती, तर नियोजन करणं सोपं जातं. दीड दिवसात आता शक्य नाही. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय. मलाही वेळ मिळेल. उमेदवारांनाही वेळ मिळेल, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान यादिवशी मुंबई आणि ठाणे या भागांत सर्व मतदारसंघात दौरा करेन. तसंही माझी अनेक भाषणं झालेली आहेत. जे सांगायचं होतं ते घराघरात पोहोचलं आहे, असेही ठाकरे म्हणाले.