हिंगोली:-भाजपप्रणित महायुतीने शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचा मार्ग निवडला, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना हा औरंगजेब फॅन क्लब असल्याची घणाघाती टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
काल, शुक्रवारी हिंगोली येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल ‘दोन चांगले शब्द’ बोलण्यास सांगावे. महायुतीने छत्रपती आणि सावरकरांचा मार्ग निवडला परंतु, उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) औरंगजेब फॅन्स क्लब बनला आहे. काँग्रेसने 70 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण केले, मोदीजींनी ते बांधले. राज्य शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांच्या मार्गावर जाणार की औरंगजेबाच्या मार्गावर जाणार हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ठरवतील. राहुल गांधींनी लक्षात ठेवावे की त्यांची चौथी पिढी आली तरी कलम 370 बहाल होणार नाही. सोनिया गांधींनी आपल्या मुलाला 20 वेळा लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 21व्यांदा त्यांचे “राहुल विमान” कोसळणार असल्याची टीका शहा यांनी केली. महाराष्ट्र शिवाजीचा आहे की औरंगजेबाच्या विचारसरणीचा आहे, यावर अमित शहा यांनी केलेली टिप्पणी हे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर मानले जात आहे. हे राज्य महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूंसारख्या पूज्य लोकांचे आहे की मोदी-शाह-अदानी यांच्या त्रिकुटाचे आहे, हे विधानसभा निवडणुका ठरवतील, असे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले होते.