2019च्या सातारा सभेची पुनरावृत्ती
इचलकरंजी:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या इचलकरंजीतील सभेवेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पवार यांनी भरपावसात भाषण सुरू ठेवले. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत सातारा येथे भरपावसात सभा झाली होती आणि त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
कालची भरपावसात सभा हे तर शुभसंकेत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
इचलकरंजी मतदारसंघाचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ दुपारी झालेल्या सभेत शरद पवार भाषणाला उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. पवार यांनी पावसातही आपले भाषण सुरू ठेवले. यावेळी उपस्थित जनसमुदयाने टाळय़ांचा कडकडाट केला.
निवडणुकीचा निकाल चांगला लागतो
महाराष्ट्रात अनेक वेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असे सुचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले. राज्यात आता सत्ताबदल केल्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.