देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागामार्फत जननायक बिरसा मुंडा व गुरु नानक जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी जनतेच्या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला दिलेली बळकटी, तसेच बिरसा मुंडा यांच्या अतुलनीय धैर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली. १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ किंवा ‘आदिवासी गौरव दिवस’ म्हणून आचरला जाण्यामागील हेतूही याप्रसंगी स्पष्ट केला.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरू नानक यांनी रचलेल्या कविता शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट केल्याचे नमूद केले. त्यांचे प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता व बंधुता यासंबंधीचे विचार सविस्तरपणे याप्रसंगी विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी, तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप मुळ्ये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अभिनय पातेरे, आणि प्रा. सुनील सोनवणे यांनी मेहनत घेतली.