संगमेश्वर:-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील चाकरमानी मतदारांना मुंबईतून ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून 200हून अधिक खासगी बसेस बुक करण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची जोरदार धूम सुरू आहे. मतांच्या गोळाबेरजेवर राजकीय नेत्यांचे व उमेदवारांचे लक्ष आहे. त्यासाठी मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. संगमेश्वर तालुक्याशी मुंबईशी नाळ जुळल्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला असलेल्या चाकरमान्यांची संख्या लाखाच्या दरम्यान आहे. हे मतदार नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. उमेदवारांनी या मतदारांच्या मुंबईत बैठका घेतल्या आहेत. त्यांचा कल जाणून घेऊन मतदानाला येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सुमारे 200 हून अधिक खासगी गाडयंचे बुकिंग झाल्याची चर्चा आहे. मागणी असल्यामुळे अन्य राज्यांतून खासगी गाडया आणल्याचे समजते. प्रतिष्ठेची लढाई असल्याने मुंबईकरांची जोरदार बडदास्त ठेवली जात आहे.