आरक्षण हिसकावून घेण्याचा काँग्रेस, मविआचा कट
नवी मुंबई:-दलित, मागासवर्गीयांमध्ये फूट पाडून, त्यांना परस्परांशी संघर्ष करावयास लावून त्यांचे आरक्षण हिसकावून घेण्याचा काँग्रेस व महाविकास आघाडीचा कट असून महाराष्ट्राची जनता हा कट राज्यात यशस्वी होऊ देणार नाही.
गती, प्रगती, ऐक्य, सुरक्षेसाठी महायुती हा एकच पर्याय आहे. केवळ विकास आणि जनहित हा महायुतीचा संकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी महायुतीला पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी खारघर येथील जाहीर सभेत बोलताना केले. महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचा आधार बनविण्यासाठी एक व्हा, महाराष्ट्राच्या विकासात आम्ही कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली. या सभेवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खा. सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे, महायुतीचे उमेदवार गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, मंदाताई म्हात्रे, महेश बालदी, आ.विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
भाषणाच्या प्रारंभी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला नम्र प्रणाम करून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या जुन्या स्मृतीस उजाळा दिला. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पक्षाने माझी निवड केली, तेव्हा मी रायगडावर छत्रपतींना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले होते, असे सांगून आपल्या सुमारे अर्धा तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी स्वराज्यातील छत्रपतींच्या सुराज्याचा संकल्प सिद्ध करण्याची ग्वाही दिली. जेव्हा गरीब सक्षम होईल, तेव्हा सुराज्य स्थापित होईल, आणि हे काम केवळ भाजपाच करू शकते, असे ते म्हणाले. काँग्रेसने ‘गरीबी हटाओ’ ची घोषणा देत गरीबांनाच लुबाडले. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनंतरही देशातील गरीब जनता अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत राहिली. गेल्या दहा वर्षांत आम्ही ही स्थिती बदलली. 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून बाहेर पडली. चार कोटी गरीबांना पक्की घरे, 12 कोटी गरीबांना शौचालये देऊन जगण्याची प्रतिष्ठा बहाल केली. जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी घरांत नळाचे पाणी पोहोचविले. आज देशातील प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे, आणि सामान्य मजूरदेखील मोबाइलवरून ‘युपीआय’ द्वारे पैशाचे व्यवहार करू शकतो. देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय, वंचित समाज हे या योजनांचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. महायुती सरकारची धोरणे ही त्यांची शक्ती बनली आहे. काँग्रेसने गरीबांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. आजही गरीबांच्या कल्याणाच्या, नागरिकांच्या सुविधांना काँग्रेस विरोध करते. देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिले जाते. रायगड जिल्ह्यातील सुमारे 18 लाख लोकसंख्येस याचा लाभ मिळत आहे, याची काँग्रेस व आघाडीस पोटदुखी आहे. गरीब गरीब राहिले तर पुन्हा सत्ता मिळेल या आशेमुळे अशा कामालाही त्यांचा विरोध आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. घुसखोरांनाही स्वस्त सिलिंडर देण्याची घोषणा काँग्रेसच्या एका नेत्याने झारखंडमध्ये केली आहे. अशा लोकांना सत्तेची संधी देऊ नये, असे ते म्हणाले. मतासाठी काँग्रेस देशाच्या सुरक्षिततेशी, भविष्याशी घातक खेळ खेळत आहे, त्यामुळे गरीबांचे शत्रू असलेल्या काँग्रेसच्या वोट बँकेच्या राजकारणास रोखण्याची तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन श्री. मोदी यांनी केले.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या अनेक जनहितकारी योजनांचा पूर्ण तपशीलच यावेळी पंतप्रधानांनी सादर केला. नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, मुंबई किनारी मार्ग, द्रुतगती मार्ग, पनवेल कर्जत रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण आदी कामांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा आणि भविष्य उजळत आहे. रायगड जिल्ह्यात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. 30 हजार कोटींची गुंतवणूक करून आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे डेटा सेंटर पार्क आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र रायगड जिल्ह्यात बनत आहे. कळंबोलीत सेंटर ऑफ एक्सलन्स बनत आहे. पनवेलमध्ये सेमि कंडक्टर उद्योगात मोठी गुंतवणूक होऊ घातली आहे. पालघर, जेएनपीटी बंदरांमुळे विकासाचे नवे मार्ग खुले होत असून हे क्षेत्र म्हणजे भविष्यातील संधींचे नवे केंद्र बनेल, व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, आणि महाराष्ट्र हे विकसित भारताचे सर्वात महत्वाचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सागरी संपत्ती आणि सागरी अर्थव्यवस्थेला आणि मच्छीमार बांधवांना बळ देण्यासाठी आमचे सरकार विविध योजना आखत आहे, असेही ते म्हणाले. 450 कोटींच्या गुंतवणुकीतून कोकणात तीन नवी बंदरे निर्माण होत आहेत. यामुळे मच्छीमारांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.