नाशिक:-लकीभाऊ जाधव यांना हरवण्यासाठी त्र्यंबकमध्ये होतो तसा कुंभमेळा करण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही.
या निवडणुकीत ज्यांनी ५० खोके घेतले त्यांना आता घरी बसवा. या लोकांनी चोरी करून सरकार स्थापन केले आहे. हे चोरांचे सरकार आहे. मोदी हे खोटारडे असून त्यांनी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे सभा घेतली यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले २०१४ च्या निवडणुकीवेळी प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आणि २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते पूर्ण केले नाही. मोदींनी शेतकऱ्यांना धोका दिला. शेतीमालाला दुप्पट भाव देणार असे म्हणाले होते. ज्यांनी हमीभावाची रक्कम वाढवली नाही, ते शेतीमालाला दुप्पट भाव काय देणार, खोट्या मोदीला शेतीचे काळे कायदे सुद्धा बदलायला लागले असा घणाघात खरगे यांनी केला. इगतपुरी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकशाही आणि संविधान टिकले नाही तर आपण संपून जाऊ. केंद्र सरकार जे आश्वासन देते ते पूर्ण करत नाही. ही नरेंद्र मोदी यांची सवय आहे. काँग्रेस सरकारने काळा पैसा बाहेर ठेवला आहे. तो परत आणून मी प्रत्येकाला १५ लाख रुपये देईल, असे मोदी म्हणाले होते. पण त्यांनी कुणालाही पैसे दिले नाही. मोदींनी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. पण तेही पूर्ण केले नाही. पंतप्रधान अशाप्रकारे खोटे बोलतात, ते खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी मराठी अभंगाची ओळ बोलून श्री. खरगे यांनी बराचवेळ मराठी भाषेत संवाद साधला. उमेदवाराचे नाव लकीभाऊ कसे ठेवले याची त्यांनी उमेदवाराला माहिती विचारली यावेळी लकीभाऊ जाधव यांनी आईवडिलांना लकी ठरलो म्हणून असे नाव ठेवल्याचे सांगितले. श्री. खरगे यांनी यावेळी काँग्रेस पक्षाला पण तुम्ही इगतपुरीतुन लकी ठराल अशी शुभेच्छा दिली. मोदींचे अदानी आणि अंबानी हे दोनच मित्रच आहे. त्यांच्यासोबत आणखीनही बरेच श्रीमंत लोक आहेत. देशातील ५ टक्के लोकांकडे देशाची ६५ टक्के संपत्ती आहे. तर ५० टक्के गरिबांकडे केवळ ३ टक्के संपत्ती आहे. यावरून सत्ताधारी गरिबांना मदत करतील की श्रीमंतांना हे बघून घ्या अशी घणाघाती टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.