श्रीगोंदा:-लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांबाबत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून माझ्या बहिणींच्या केसाला जरी धक्का लागला तर हात छाटेल, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, अमित शाह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरच्या कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याला कलम 370 पेक्षा त्याची कर्जातून मुक्तता कधी होणार? त्याच्या शेती अवजारावरील जीएसटी कधी माफ होणार याची चिंता आहे. त्यांना मालाला भाव मिळत नाही. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. ते हटणार का याची चिंता शेतकऱ्याला आहे. मात्र त्याबाबत कोणी काही बोलत नाही. त्यावर अमित शाह यांनी बोलले पाहिजे. फक्त काश्मीरमधील कलम 370 बद्दल बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाह यांनी काश्मीर सोडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबद्दल बोलावे, असे ठाकरे म्हणाले. शिवाय काश्मीरमधील कलम 370 कलम शिवसेनेचा पाठिंबा होता म्हणून हटवता आलं असेही ठाकरे यांनी सांगितले.
ज्यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याला विरोध केला त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसले आहेत असंही अमित शाह म्हणाले होते. त्याला प्रत्त्युत्तर देताना, तुम्हाला राजकारणात गाडण्यासाठी त्यांच्या बरोबर गेलो आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. त्यांच्या कांद्याला भाव नाही. सोयाबीन आणि कापसाची स्थितीही तिच आहे. मविआने शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे काही निर्णय हे शेतकऱ्याच्या विरोधात घेतले. गुजरातच्या कांदा उत्पादकांसाठी एक निर्णय आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसरा निर्णय घेतला गेला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचंही ते म्हणाले.