सावंतवाडी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी करून सावंतवाडी येथील विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अर्चना घारे यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
याबाबतचे आदेश पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडून देण्यात आले. याबाबतची माहिती शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी दिली.
अर्चना घारे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला सुटलेला असताना या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. पक्ष नेतृत्वाकडून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतर सुद्धा त्यांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्यावर हकालपट्टीची कारवाई झालेली नाही, होणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची तात्काळ दखल घेण्यात आली असून निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उभे राहिल्याचा तसेच पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या समवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचे संकेत भास्कर परब यांनी दिले आहेत. याबाबत व्हाट्सअपच्या माध्यमातून अर्चना घारे यांना कळविण्यात आले आहे.