मुंबई:-विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी थंडावतील. त्यामुळे प्रचाराच्या टप्प्यातील अखेरच्या रविवारची सभा हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच असते. यंदा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आग्रही होते. यासाठी दोन्ही पक्षांकडून मैदानाची परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली असून त्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण असे असले तरी १७ नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांसाठी या दिवसाला वेगळंच महत्त्व आहे. अशावेळी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादनासाठी मोठी गर्दी होत असते. तर यंदा या दिवशीच शिवतीर्थावर राज गर्जना होणार असल्याने, या सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या आधी मनसेकडून यासाठी परवानगी अर्ज केला गेला होता. त्यामुळे नियमानुसार ही परवानगी देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. मात्र सभा आणि स्मृतीदिन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आणि एकाच दिवशी येणार असल्याने राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे येतील. त्यामुळे अभूतपूर्व गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी पोलीस आणि प्रशासन यांची विशेष कसर असणार आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावर होणारी उद्धव ठाकरेंची सभा आता बीकेसी मैदानावर घेण्याचं पर्यायी नियोजन आधीच केल्याची माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे अमित ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई यांच्या प्रचारार्थ त्यांच्या मतदारसंघात सभा घेताना दिसून येतील. एकाच दिवशी दोन ठाकरी तोफा वाजणार असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.