संगमेश्वर: कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच पडते असे नव्हे, तर कवी आणि लेखक यांनाही पडत असते. त्यांनी कोकणचा हा नितांत सुंदर निसर्ग शब्दबद्ध करून जगभर पोहचवला आहे.
विद्यार्थ्यांनीदेखील दैनंदिन वाचन करून काहीतरी लिहिले पाहिजे. या सुंदर निसर्गावर लिहायला सुरुवात केल्यानंतर शब्द कमी पडतील. आपले लेखन वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य उपयोग करा, असा आवाहन चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी केले.
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचालित पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ विद्यार्थ्यांशी साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, कवी महादेव कोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक खामकर यांनी चपराक प्रकाशन संस्था आणि संपादक घनश्याम पाटील यांची ओळख करून दिली. व्यापारी पैसा फंड संस्थेतर्फे सचिव धनंजय शेट्ये यांनी घनश्याम पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे आणि गुरुजनांचे ऋण कधीही विसरू नये. शिक्षणात आता नवनवीन बदल होत आहेत, या बदलाचा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग करून घ्यावा.
कवी महादेव कोरे यांनी यावेळी काही कविता सादर करून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी आभार मानले.
पैसा फंड इंग्लिश स्कूलचे भव्य कलादालन पाहून मी भारावून गेलो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले, तर त्यांची कला कशी बहरते, आम्हाला येथील कला वर्ग आणि कलादालनात पाहायला मिळाले, असे घनश्याम पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
कलादालनातील कलाकृती हा संस्था आणि शाळेसाठी खूप मोठा ठेवा असल्याचे कवी आणि कलाप्रेमी महादेव कोरे यांनी सांगितले. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी कलादालनात पाटील आणि कोरे यांना कलाकृती भेट देत सन्मानित केले.