वनविभागाकडून माहिती अधिकारात माहिती उघड
पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांची माहिती
चिपळूण:-जिल्ह्यात चिपळूण वनपरिक्षेत्रांतर्गत मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची ओरड नेहमीच होत असताना वनविभाग मात्र दुर्लक्ष करीत आले आहे. आता माहिती अधिकारात वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या 27 दिवसांच्या कालावधीत तब्बल 225 ट्रक वाहतूक झाल्याचे उघड झाले आहे. म्हणजेच सरासरी विचार करता वर्षाला 4,830 ट्रक वाहतूक होत असून सुमारे 40 लाख 38 हजार वृक्षांची कत्तल होत असून हे गंभीर असल्याची माहीती पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांनी दिली.
ते म्हणाले की, चिपळूण वन परिक्षेत्रात चिपळूण, गुहागर, सावर्डे हा भाग येतो. 6 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या 27 दिवसांच्या कालावधीत अधिकृत माहितीनुसार, चिपळूण 77, सावर्डे 63, गुहागर 85 असे एकूण 225 ट्रक भरून लाकूड वाहतूक झाली आहे. म्हणजे प्रति दिन सरासरी 13.23 ट्रक व प्रतिवर्षी 4,830 ट्रक म्हणजेच अधिकृत 1 लाख 11 हजार 110 घनफुट लाकूड परवाना दिला गेला आहे. एक घन मीटर लाकडाचे त्याच्या प्रकारानुसार वजन 300 ते 900 किलो असते म्हणजेच 8.5 ते 25 किलो सरासरी 16.75 किलो असते. ट्रकातून 15 ते 18 टन लाकूड वाहतूक करता येते, म्हणजे 955 घनफुट 6 इंच त्रिजेचे म्हणजे 1 फूट व्यासाचे 3.14 फूट गोलाईचे 30 फूट उंचीचे झाड हे 0.816 घनफुट म्हणजे 13 किलो भरते. अशी एका ट्रकामध्ये या मापाची 1,384 झाडे आपण कमी जास्त गोलाईची 800 झाडे पकडू. याचा अर्थ चिपळूण वनक्षेत्रात प्रति दिन 11 हजार 64 झाडे याचा अर्थ प्रतिवर्षी 40 लाख 38 हजार आणि जर याच्या दुप्पट गोलाईची झाडे धरली तर 20 लाख 19 हजार व तिप्पट गोलाईची असली तर 13 लाख 46 हजार वृक्षाची कत्तल होते.
एक तर लावलेल्या झाडापैकी सर्वसाधारण मेहनत घेतली तर 60 टक्के झाडे जगतात. झाड वाढायला सरासरी 7 ते 20 वर्षे जातात. जंगलात तर सध्या विशेष झाडे लावायला फार कमी लोक जातात. जी काही नैसर्गिक उगवतात, त्यांना वणवा जाळून टाकतो. जंगलतोडीची अधिकृत आकडेवारी लक्षात घेतली तर हा प्रकार महाभयानक आहे. या अधिकृत आकडेवारीच्या दीडपट तरी विनापरवाना वाहतूक होते. तसेच ओव्हरलोड ट्रक भरले जातात. झाडे आपल्याला जीवन देतात, ऑक्सिजन देतात, अन्न देतात, पाणी देतात यांच्याबाबत कुणी जराही गंभीर नाही. कोकणातील वृक्षतोड पूर्ण बंद झाली पाहिजे, असे आश्वासन आपण आपल्या उमेदवाराकडून घेतले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणात वृक्षतोड बंदी गरज
झाडे जगवणाऱ्या शेतकऱ्याना सर्वेक्षण करून कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून पैसे मिळाले पाहिजेत, स्थानिक लाकूडतोड कर्मचाऱ्याचे पुनर्वसन झाले पाहिजे. त्यांना उद्योग किंवा कामधंदा मिळाला पाहिजे, कोकणात औद्योगिक वृक्षतोड बंदी झालीच पाहिजे. जंगलातून मल्टी कल्चर वृक्ष लागवड संगोपन संवर्धनासाठी कायदा व निधी उपलब्ध झाला पाहिजे, असेही शाह यांनी स्पष्ट केले.