कर्जत:- मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले. पण त्यात यश आले नाही म्हणून त्यांनी आता मुंबई अदानीच्या घशात फुकटात घालण्याचा डाव आखला आहे. तुमच्या, आमच्या हक्काची मुंबईतील 1 हजार 80 एकर जमीन अदानीला आंदण दिली आहे.
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून इथल्या तरुणांना बेरोजगार केले जात आहे. महाराष्ट्राचे नाव गुजराष्ट्र किंवा अदानीराष्ट्र करण्याचा डाव असून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या भाजप-मिंधेंच्या खोके सरकारला हद्दपार करा आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची, स्वाभिमानाची मशाल पेटवा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
कर्जत-खालापूरचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत तसेच उरण-पनवेलचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या कर्जत व मोहोपाडय़ात दोन दणदणीत सभा झाल्या. त्याआधी दापोली येथे संजय कदम यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी मिंधे-भाजप आणि अजित पवार गटाच्या ‘महाझुटी’ सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी उपनेते सचिन अहिर, महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत, मनोहर भोईर, काँग्रेसचे श्रीरंग बर्गे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रृती म्हात्रे, लाल ब्रिगेड संघटनेचे राजेंद्र पाटील, आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, मिलिंद पाडगावकर, अकलाख शिलोत्री, उल्हासराव देशमुख, रिचर्ड जॉन, कम्युनिस्ट पक्षाचे ऍड. गोपाळ शेळके, शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, शिवसेना महिला आघाडीच्या सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे, शकील कुरेशी उपस्थित होते.