संगमेश्वर:- गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांनी चिपळूण संगमेश्वर मधील तरुणांसाठी एमआयडीसी विकास, कॅशलेस हॉस्पिटल, शिक्षणाचा दर्जा सुधारणे व शेती विकास या गॅरंटी दिल्या असल्याने यावेळी तरुण वर्गाने शिट्टी चिन्हाला मतदान करावं असे सांगताना संगमेश्वर चिपळूण मतदार संघातील मुस्लिम समाजातील तरुणांनी रोजगारासाठी होणारे स्थलांतर, हॉस्पिटल बाबत असलेल्या असुविधा,शिक्षणासाठी असलेल्या अडचणी लक्षात घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी गाव विकास समितीला मत द्यावे असे आवाहन गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी केले आहे.
आपल्या भागातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर हे सर्वाधिक आहे. तरुण वर्गाला रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागते. एमआयडीसी विकास झाल्यास या ठिकाणी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर जिल्ह्यात शासकीय नोकर भरतीत सुद्धा तरुणांना डावलले जाते. रोजगाराच्या गंभीर प्रश्नावर गाव विकास समितीने आवाज उठवला असून एमआयडीसी विकासासाठी येथील तरुण वर्गाने गाव विकास समितीच्या मागे उभे राहावे असे आवाहन मुझम्मील काझी यांनी तरुणांना केले आहे. त्याचबरोबर आपल्या भागात आरोग्याच्या समस्या गंभीर असून येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही. गाव विकास समितीने कॅशलेस हॉस्पिटल उभारण्याची गॅरंटी दिली आहे.परिणामी आपल्या गावांच्या भविष्यासाठी येथील तरुण वर्गाने गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे व शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून आपल मत विकासाला द्यावे असेही मुझम्मील काझी यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाजातील सुजाण तरुण वर्गाने यावेळी परिवर्तनासाठी मतदान करावे.जोपर्यंत आपण आपल्या गरजा लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्या गावांचा विकास होणार नाही असेही मुझम्मील काझी यांनी म्हटले आहे.