निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे मतदान होणार नसल्याचे स्पष्टीकरण
दापोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी 263 दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदान होणार आहे. मात्र सध्या 17 नंबर फॉर्म भरून मतदान करण्याबाबत ‘फेक मेसेज’ दापोलीत फिरत आहेत. या बाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानीही अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या मतदारांचे यादीतून नाव डिलीट असा शिक्का लागला असेल तर ते लोक किंवा व्यक्ती मतदान केंद्रावर फॉर्म नं. 17 भरून आणि आपले मतदानकार्ड किंवा आधारकार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे की, ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील फॉर्म भरावा आणि मतदानाचा हक्क बजवावा, असा ‘मेसेज’ दापोलीत फिरत आहे. मात्र हा मेसेज फेक असून अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नसल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दापोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.