लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखवा
रत्नागिरी:-हात, पाय आणि तोंडाचा रोग (आजार) हा कॉक्ससाकी व्हायरस आहे.हा विशेषकरून लहान मुलांमध्ये पसरतो आणि हात, पाय आणि तोंडावर परिणाम करतो. काहीवेळा मोठी मुले व प्रौढांनादेखील याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.
हँड, फूट आणि माउथ डिसीज (एचएफएमडी) हा कॉक्ससाकी व्हायरस आहे. या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. ज्याला आपण मराठीत हात, पाय आणि तोंडाचा रोग (आजार) म्हणतो. हा विशेषकरून लहान मुलांमध्ये पसरतो आणि हात, पाय आणि तोंडावर परिणाम करतो. त्यामुळे संपूर्ण शरीरावर खडबडीत फोड, पुरळ पसरते. हा आजार सहसा ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना संक्रमित करतो; परंतु काही वेळा मोठी मुले व प्रौढांनादेखील याचा त्रास होऊ शकतो. मुलांच्या अंगावर पुरळ उठण्याची समस्या असल्यास पालकांनी जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन त्वरित उपचार करावा तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास शाळा प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे.