वाढवण बंदर आणि विमानतळाने पालघरमध्ये विकासाची गंगा
पालघर:-लाडक्या बहिणीला केवळ १५०० रुपयांपर्यंत थांबवणार नाही तर त्यात आणखी वाढ करणार आहोत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जनतेला काही दिले नाही.
आता महायुतीच्या योजनांची चौकशी करुन जेलमध्ये टाकायची भाषा करताय. राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांच्यासाठी एकदा काय शंभरदा जेलमध्ये जायला तयार आहे. आम्हाला हलक्यात घेतले म्हणून दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बोईसरचे उमेदवार विलास तरे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, राज्यात केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार काम करत आहे. सरकारने लोक कल्याणच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली. आता मतदान झाले की लगेच डिसेंबरचे पैसे देणार असे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात ७६,००० कोटींची गुंतवणूक असणारे वाढवण बंदराचे काम सुरु झाले आहे. याशिवाय सी-लिंकचा विस्तार पालघर डहाणूपर्यंत करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. वाढवण बंदराबरोबरच येथे सरकारने विमानतळ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पालघरचा विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे. या राज्यात विकासाचे विकेंद्रीकरण करणार असून राज्यात कुठूनही पोहोचण्यासाठी सहा तांसावर वेळ लागणार नाही असा अँक्सिस कंट्रोल ग्रीड तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर आणि पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस सी लिंक तयार होणार आहे. त्यामुळे इथल्या जनतेला कमी वेळेत मुंबईत पोहोचता येईल. त्याशिवाय ‘एमएमआरडीए’चा पालघरपर्यंत विस्तार केलाय. पालघरमध्ये नवीन विमानतळ उभारतोय. मोठ्या प्रकल्पांमुळे पालघर एक ग्रोथ सेंटर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. वाढवण बंदरात केंद्र सरकारने ७६००० कोटींची गुंतवणूक केली आहे. इथल्या मच्छिमारांना त्याचा फायदा होईल. राज्य सरकार मच्छिमार समाज बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता सोबत असल्याने आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले, राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये निवडणुकीत काँग्रेसने खोटी आश्वासने दिली आणि मते मिळवली. सत्ता आल्यावर काँग्रेसने लोकांची फसवणूक केली. योजनेसाठी पैसे नाहीत असे बोलून केंद्राकडे हात पसरले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शासन आपल्या दारी उपक्रमात ५ कोटी नागरिकांनी लाभ घेतला. त्यापूर्वी महाविकास आघाडीने अडीच वर्ष प्रकल्पांमध्ये खोडा घातला. समृद्धी एक्सप्रेस, जलयुक्त शिवार योजनेत खोडा घातला होता. मात्र मागील दोन वर्षात सरकारने सर्व स्पीडब्रेकर काढून टाकले, असे ते म्हणाले.