सिंधुदूर्ग:-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अॅलर्ट झाली असून पोलिस कर्मचार्यांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येणार्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी करत आहेत.
महाराष्ट्र दौर्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग सलग दोन दिवस वणी व औसा येथे निवडणूक अधिकार्यांकडून तपासण्यात आल्यानंतर सिंधुदुर्गातही ठाकरे यांच्या दौर्यात याची पुनरावृत्ती दिसून आली. यावेळी मात्र त्यांची बॅग न तपासता केवळ गाडीची तपासणी करून सोडण्यात आली.
बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभा होत्या. ठाकरे गोवामार्गे सिंधुदुर्गात येत असताना दुपारी 1 वा. च्या सुमारास इन्सुली तपासणी नाका येथे निवडणूक पथकाने त्यांचा ताफा रोखला. उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे एका गाडीत होते. त्यांच्या गाडीची पाहणी केली.
त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या अन्य गाड्यांची तपासणी केली. यावेळी काही काळ गाडीकडे कोणी अधिकारी व कर्मचारी न आल्याने ठाकरे यांनी गाडी का थांबवली? अशी विचारणा केली असता कोणीच कर्मचारी येईना. त्यावेळी ताफ्यात असलेले शिवसेनेचे पदाधिकारी शैलेश परब यांनी उपस्थितांना गाडी का थांबवली? अशी विचारणा केली. मात्र यावेळी कोणीच काही न बोलल्याने पुढील वाहनांना रवाना होण्याच्या सूचना दिल्या.