महाड:- मिंध्यांचे महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भरत गोगावले यांच्याविरोधात स्थानिक बौद्ध समाज एकवटला आहे. वारंवार संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना कदापिही आम्ही थारा देणार नाही. शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांनाच मतदान करण्याचा निर्धारदेखील करण्यात आला.
बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना पदाधिकारी विश्वनाथ सोनवणे तसेच त्यांचे सहकारी राहुल साळवी यांनी सांगितले की, महाड तालुक्यात भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी एक मेळावा आयोजित केला होता. मात्र हा मेळावा बौद्ध समाजाचा नसून काही मोजक्याच लोकांनी तो भरवला होता. पण आमचा पाठिंबा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाडच्या भूमीने नेहमीच क्रांतिकारी बदल केला असून त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. समतेचा विचार मांडणाऱ्यांनाच आम्ही पाठिंबा देत असल्याचे राहुल साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाड तालुक्यातील तरुणांना उत्तम शिक्षण, रोजगार मिळणे आवश्यक आहे. मात्र गेल्या 15 वर्षांत हा विकास का झाला नाही, असा सवाल करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा न करता बौद्ध समाजातील तरुणांनी आपली सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनिल जाधव, संजय सोनवणे, सखाराम सकपाळ, तुळशीराम जाधव, प्रकाश मोहिते, भीमराव धोत्रे, अरुणा आजगावकर आदी यावेळी उपस्थित होते.