चिपळूण:-ज्याप्रमाणे आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्यात आले त्याचा सूड घेण्याची ही वेळ आलेली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार महत्वाचा आहे. उठा पेटून उठा आणि प्रशांत यादव यांना हजारो मतांनी विजयी करून गद्दारांना त्यांची जागा दाखवा.
अशा अत्यंत आक्रमक शब्दांत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी देवरुख येथील कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ देवरूखच्या मराठा भवनात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्या बरोबर माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, सुभाष बने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, महिला आघाडीप्रमुख वेदा फडके, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख नेहा माने, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष तसेच आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला तुफान गर्दी उसळली होती.
श्री. जाधव म्हणाले, मी फक्त प्रशांत यादव यांच्या प्रचाराला आलेलो नाही. मी तळमळतोय, मला वेदना होत आहेत. कारण माझ्या पक्षप्रमुखांना ४० गद्दारांनी धोका दिलाय, ते भयंकर आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलाय, तो दिवस आठवला की अंगाचा तिळपापड होतो. त्यामुळे माझा मतदारसंघ सोडून मी वणवण फिरतोय, माझ्या विजयाची चिंता मला नाही. माझा एक एक कार्यकर्ता घरात घरात जाऊन प्रचार करतोय. पण मी लढतोय ते माझ्या पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी, शेवटी माझा पक्षप्रमुख माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, पाठोपाठ शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, अरे हे पाप कशासाठी केलंत?आणि सांगतात, आम्ही विकासासाठी गेलो. अरे वा तुमची…. कसल्या विकासाच्या गप्पा मारता, कोणाला सांगता, पण छगन भुजबळांनी स्वतः सर्व पोलखोल केली आहे. इडी आणि सीबीआयमुळे आम्हाला भाजपबरोबर जावे लागले, अन्यथा जेलमध्ये जावे लागले असते, असे स्वतः भुजबळ बोलले. त्यामुळे गद्दारांचा खोटेपणा उघड झाला आहे. त्यांचा हजारो कोटींचा विकास आणि सुरू असलेली थापेबाजी, मुस्लिम समाजाची विकासाच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक, अशी सर्व त्यांची पोलखोल करतो. त्यांचे वाभाडेच काढतो खोकेखोर गद्दारांना घरी बसल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही आणि तुम्हालादेखील शांत बसू देणार नाही.
प्रशांत यादव विजयी होणार असे बोलून किंवा घोषणा देऊन निवडणूक जिंकता येणार नाही. निवडणूक तितकी सोपी नसते. त्यासाठी तुम्हाला घराघरात जावे लागेल. महाविकास आघाडीची भूमिका, उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय, शरद पवार साहेबांबरोबर झालेली गद्दारी लोकांना पटवून सांगावी लागेल. तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी घराघरात पोहोचवावी लागेल. त्यामुळे आता थांबू नका, तुमच्या धमन्यातील रक्त सळसळू दे, लागा कामाला आणि प्रशांत यादव यांना हजारो मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा. असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले.