रत्नागिरी:-शहरातील चर्मालय-साळवी स्टॉप रस्त्यावरील स्टेट बँक कॉलनी येथे दुचाकीला धडक देणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली होती. चैतन्य सहदेव पवार (38, रा.क्रांतीनगर रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अलीम हमीद धालवेलकर असे अपघातातील जखमीचे नाव आहे. अलीम हे 8 नोव्हेंबरला दुचाकीने (एमएच-08/एडब्लू-980) साळवी स्टॉप ते चर्मालय रस्त्याने जात होते. सकाळी 10 च्या सुमारास ते स्टेट बँक कॉलनी येथे आले असता चैतन्य पवारने रिक्षाने अलीम यांच्या दुचाकीला धडक दिली, अशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.