पोलिसांच्या कौशल्याचे कौतुक
चिपळूण:-शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात काही दिवसांपूर्वी बेवारस मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या स्वरुपात असलेला त्याची ओळख पटवणे अवघड होते. असे असताना पोलिसांना त्या मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या लेबलवरून मृतदेहाची ओळख पटवली आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.
शहरातील वाशिष्ठी नदीत गांधारेश्वर मंदिर परिसरात 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. या मृतदेहाबाबत पोलीस स्थानकात नोंद करून त्या अधिक तपास हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर यांच्याकडे देण्यात आला. मृतदेह कुजलेल्या स्वरुपात असल्याने अखेर त्याच्यावर 8 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच हा मृतदेह कोणाचा याचा उलगडा होत नव्हता. तपासाच्यादृष्टिने त्या मृतदेहाचे शर्ट ताब्यात घेऊन ते स्वच्छ करण्यात आले. त्यावर विश्वास टेलर असे लेबल लावले होते.
येथून तपासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. त्यानुसार हा टेलर कोण, तो कुठला याचा शोध घेतल्यानंतर तो नवी मुंबई-तुर्भे येथील असल्याचे पुढे आले. त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त होताच टेलर स्वप्निल शिंदे यांच्याकडे आंबेकर यांनी संपर्क साधला. त्यांनीदेखील पोलिसांना सहकार्य करत हा शर्ट कोणाचा आहे याची नोंद शोधून तो आदम इब्राहिम मालदार नामक व्यक्तीचा असल्याचे सांगितले. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल आंबेरकर यांनी आदम यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. आदम याच्या मुलाशी संपर्क झाल्यानंतर त्यांना चिपळूण पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. आदम यांचे तीन मुलगे पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर मृतदेहाचे वर्णन, त्याचा फोटो व कपडे यानुसार हा मृतदेह आदम यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
आदम याचे मूळ गाव हे चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रूक येथील नुरानी मोहल्ला येथील आहे. त्याठिकाणी येणे-जाणे सुरु होते. शिवाय त्यांना दारुचे व्यसन देखील असल्याचे तपासातून पुढे आले. एकूणच पोलिसांनी या तपासात दाखवलेल्या कौशल्याचे कौतुक होत आहे.