पाली : विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे, तशा प्रचाराच्या फैरी झडू लागल्या आहेत. यापेक्षा वेगळी प्रचार यंत्रणा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा किरण सामंत यांनी राबवली आहे.
वर्षा सामंत सध्या प्रत्येक गावातील शाखेत भेट देऊन महिला वर्गाशी संवाद साधत असून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. यावेळी त्या स्थानिक महिलांशी संवाद साधताना”महिलांसाठी असणाऱ्या योजना महिलांपर्यंत पोहोचतात की नाही याबाबत चर्चाही करत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून यापुढे उद्योग धंद्याबाबत काही अडीअडचणी आल्या तर आपण सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले. तसेच किरण सामंत यांनी यापूर्वी केलेल्या कामांची माहिती घरा घरात पोहचवा, प्रचारात कुठेही कमी पडू नका, येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सर्वांनी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून किरण सामंतना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या” असे सर्व जमलेल्या महिला वर्गाला आवाहन केले.
वर्षा सामंत यांनी अंजनारी ,खानू, मठ, नाणीज, करंजारी, देवळे, दाभोळे या गावांना भेटी देऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. महिला वर्गाची ही त्यांच्या प्रचार यंत्रणेत मोठी गर्दी होत आहे.