रत्नागिरी – खल्वायन रत्नागिरी या संस्थेची ३०७ वी मासिक संगीत सभा शनिवार दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. कै. संजय मुळ्ये स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या मैफलीमध्ये मूळच्या आसामच्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या प्रसिध्द गायिका श्रृती बुजरबरुवा यांच्या शास्त्रीय ख्याल गायना बरोबरच दादरा,अभंग व नाट्यसंगीत गायनाने सदरहू मैफल रंगतदार झाली.
कार्यक्रमाचे सुरवातीला रत्नागिरीच्या युवा गायिका व अभिनेत्री सौ. मधुरा लाकडे यांचे हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन झाले. त्यानंतर प्रदिप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक करून कलाकारांची ओळख करून दिली. संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हस्ते सर्व कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले.
मैफलीची सुरवात श्रृती बुजरबरुवा यांनी पुरिया कल्याण या रागातील विलंबित एकतालात निबद्ध असलेल्या “आज सो बन” या बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तीनतालातील ” मन हरवा आयो रे” ही बंदिश त्यांनी पेश केली. पुरीया कल्याण रागाचे स्वरूप स्पष्ट करीत थोडक्यात सरगम, आलाप, ताना याद्वारे आपल्या सुमधूर आवाजाव्दारे त्यांनी मैफलीत सुरवातीलाच रंग भरला. त्यानंतर मोरी गुईयॉ सावरिया हा दादरा त्यांनी सादर केला. त्यानंतर अंग अंग तव अनंग व युवती मना दारुण रण ही दोन नाट्यपदे सुध्दा त्यांनी तेवढ्याच दमदारपणे सादर केली. शेवटी अवघे गरजे पंढरपूर हा अभंग गावून त्याला जोडून श्री विठ्ठलाचा गजर घेत त्यांनी आपल्या मैफलीचा गोड शेवट केला. मैफलीला तेवढीच समर्पक व दमदार साथ संगत तबला – हेरंब जोगळेकर व हार्मोनियम साथ – चैतन्य पटवर्धन या रत्नागिरीच्या आघाडीच्या जोडगोळीने केली. तानपुरा साथ कु. अनुष्का देवरुखकर व तालवाद्य साथ प्रभंजन नाखरे यांनी केली.
मैफल यशस्वीतेसाठी र ए सोसायटी, जांभेकर विद्यालय, किरण बापट, पुणे, संजू बर्वे , दिलीप केळकर इ. चे मोलाचे सहकार्य लाभले.