रायगड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर ११ नोव्हेंबर रोजी सामुहिक धाडसत्र मोहिम राबविली आणि एकूण सात गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत २०० लीटर क्षमतेच्या ३५४ ड्रम्स, १ हजार लीटर क्षमतेचे तीन बॉयलर व अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत २० लाख ७५ हजार आहे. अशी माहिती कोकण विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रदीप पवार यांच्याकडून देण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
विधानसभा निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करून हातभट्टी दारू, अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाडसत्र राबवित आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री याविषयी तक्रार द्यावयाची असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 18002339999 वर द्यावी, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई पार पडली आहे. या कारवाईमध्ये ठाणे उपअधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, सहा. दुय्यम निरीक्षक एच.एम देवकाते, रणजीत आडे, ए. एम कापडे, जवान संदीप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजू राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहीरे, प्रवीण धवणे, रूपेश खेमनार, नितीन लोखंडे यांनी सहभाग घेतला, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.