मुंबई:-राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. राज्यातील जवळपास 47 मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. मुंबईतही शिंदे आणि ठाकरे गटाचे उमेदवार आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूने विजयासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान मुंबईतील जोगेश्वरीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिस्थिती तणावाची निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
जोगेश्वरीमधून खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. तर, ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक बाळा नर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिंदे गटाकडून महिलांना वस्तू वाटप करण्यात येत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वायकरांच्या मातोश्री क्लबवर जाब विचारण्यासाठी गर्दी केली. या दरम्यान,काही प्रमाणात दगडफेक, काही वस्तू एकमेकांवर फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हा गोंधळ सुरू असताना त्या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. मातोश्री क्लब इथे वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. मारहाण, निवडणूक आचारसंहितेचा भंग या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटावर आरोप केला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या महिलांला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचेही शिंदे गटाने म्हटले.