पालघर:-मोदी सरकार आणि महायुती सरकारने कायम आदिवासी, ओबीसी,मागास समाजाला न्याय देण्यासाठी काम केले आदिवासींसाठी अनेक योजना आखल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.
मात्र, विरोधकांनी आदिवासी समाजाला न्यायापासून वंचित ठेवले असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. जव्हार (जि. पालघर) येथे महायुतीचे विक्रमगडचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी खा. हेमंत सावरा,पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, बोईसर महायुती (शिवसेना) उमेदवार विलास तरे, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, माजी आमदार विवेक पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते. विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला पुन्हा सत्ता द्या, असे आवाहनही फडणवीस यांनी या सभेत केले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आदिवासी समाजातील एका महिलेला देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान करत ख-या अर्थाने आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र, याला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसनी विरोध केला होता याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. विरोधकांनी आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणाच्या योजनांचे लाभ आदिवासी, मागास समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री असताना पाणी योजना, विविध प्रकल्प मागास भागात आणले, कुपोषणावर मात करण्याचे काम केले. एकट्या पालघरमध्ये 36 लाख एकराचे वनपट्टे आम्ही देण्याचे काम केले आहे. मोदी सरकार आणि महायुती सरकारने महिला आणि मागास घटकांच्या कल्याणाकरिता आणलेल्या योजनांची माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.
बिरसा मुंडा योजना, जनमन योजना, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, वसतीगृह व्यवस्था सारख्या अनेक योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. आमचे सरकार आल्यास वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज रुग्णालय देऊ, असा शब्दही फडणवीस यांनी दिला.
कातकरी समाजासाठी दिलेल्या जमिनी धनदांडग्यांनी बळकावल्या होत्या त्या जमीनी पुन्हा त्यांना देऊ करत आमच्या सरकारने त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले असेही फडणवीस यांनी नमूद केले.
आशियातील सर्वात मोठे वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे भूमीपुत्रांना रोजगार प्राप्त होईल, कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून पालघरमधील युवकांना प्रशिक्षीत केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे विमानतळाची घोषणा केली आहे. बंदर आणि विमानतळ यामुळे येथील फळे आणि भाज्या उत्पादक शेतक-यांचा माल हा जगात निर्यात होईल आणि गरीब शेतक-याला फायदा होईल, असेही ते म्हणाले.