यवतमाळ:-महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नेत्यांची बॅग तपासण्याची प्रक्रिया कडकपणे राबवली जात आहे, मात्र यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच बॅग वारंवार तपासली जात असल्याने ते आक्रमक झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या ठाकरेंची हेलिपॅडवर बॅग तपासली गेली. त्यावर ठाकरे संतापले आणि मोदी, शिंदे, फडणवीसांचीही बॅग तपासल्याचे व्हिडिओ मागितले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शूट केला व सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. त्याचवेळी, औसा मतदारसंघात पुन्हा त्यांच्या बॅगची तपासणी झाली, ज्यामुळे ठाकरे अधिक संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत, आयडी व अपॉईंटमेंट लेटर दाखवण्यास सांगितले.
औसा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले असताना झालेल्या या घटनेवर ठाकरे म्हणाले की, दरवेळेला मीच का पहिला गिऱ्हाईक? त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे राज्यभरातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे.या घटनेवरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. औसा मतदारसंघात ठाकरे गटाचे दिनकर माने यांचा महायुतीचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी सामना होत आहे.