रत्नागिरी:-रत्नागिरीतील प्रतीपंढरपूर मानल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटे काकड आरती आटोपल्यानंतर हजारो भाविकांनी दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. भजन, किर्तनातून हरिनामाच्या गजराने सारे वातावरण भक्तीमय होऊन गेले होते. या उत्सवाच्या यात्रेमुळे रत्नागिरी शहर जणू गजबजून गेले होते.
या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी उत्सव येथे मोठया भक्तीमय वातावरणात साजरा होतो. मंगळवारीही कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर परिसर व शहर उत्सवानिमित्ताने गजबजून गेला होते. त्यामुळे येथील वातावरण भक्तीमय झालेले दिसले. येथील उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच रत्नागिरी शहरात भाविकांची गर्दी वाढली होती.
श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीला पहिली पूजा झाल्यानंतर पहाटे काकड आरती होऊन उत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी आद्यपूजा मान यावेळेस येथील उद्योजक संतोष एकनाथ नलावडे व समता संतोष नलावडे या दाम्पत्याला लाभला. त्यांच्याहस्ते आद्यपूजा पार पडली. त्यानंतर मंदिरात दिवसभर भजनांद्वारे हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी मोठया रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट, विद्युतरोषणाईने सारा परिसर झळाळून गेला होता तर या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी दिवसभर झुंबड उडाली होती. त्यातून लाखोंची आर्थिक उलाढाल झाल्याचे व्यापारीवर्गातून सांगण्यात आले.