जिल्हाध्यक्ष अण्णा जाधवांसह पाच आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
चिपळूण:-गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी 15 दिवसांपूर्वी कळंबट येथील प्रचार बैठकीत जातीवाचक उद्गार काढल्याच्या निषेधार्थ वातावरण तापले आहे. मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळयाजवळ आमदार जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केले. दरम्यान, मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वंचितचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासह 5 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
चिपळूण तालुक्यातील कळंबट-फणसवाडी येथे 27 ऑक्टोबर रोजी आयोजित प्रचार बैठकीत महाविकास आघाडो उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाक उद्गार काढल्याचा आरोप वंचीत बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी करत जाधव यांची चौकशी करुन त्यांच्यावर ऍट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन चिपळूण पोलिसांना दिले होते. असे असताना जाधवांच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळयाजवळ आमदार जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी करत अण्णा जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. यावेळी झालेल्या घोषणाबाजीनंतर या परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.