दापोली:-मंडणगड येथील दीपक रामचंद्र गायकवाड (47) याला दापोली येथे ऋषिकेश राजकुमार कांबळे व राजकुमार कांबळे (दोघेही राहणार उरुल तालुका पाटण जिल्हा सातारा) यांनी मारहाण केल्याची घटना बुधवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 12.15 च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओंकार जीवन कोलगे (31 राहणार दापोली उदयनगर) याचा मानलेला भाऊ दीपक गायकवाड ( मंडणगड) याची पत्नी शितल गायकवाड हिचा मंडणगड येथे राहत्या घरी गळफास लावून घेतल्याने मृत्यू झाला होता. तिचे शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे तिला आणण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे ऋषिकेश कांबळे व राजकुमार कांबळे यांनी शितल हिला तूच मारलेस असे बोलून दीपक गायकवाड यांना शिवीगाळ केली. तसेच रागाच्या भरात ऋषिकेश कांबळे याने उजव्या हाताच्या थापटाने दीपक गायकवाड याच्या डाव्या कानाखाली जोराने मारली. फटका वरमी बसल्यामुळे दीपक गायकवाड खाली जमिनीवर पडले. त्यात त्याच्या डोक्याला जमिनीवरील दगड लागून डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली. त्यांना उपचाराकरिता वालावलकर रुग्णालय डेरवण या ठिकाणी हलविण्यात आले.
गायकवाड बेशुद्ध असल्यामुळे त्यांचे नातेवाईक व फिर्यादी हे वालावलकर रुग्णालय डेरवण येथेच गेले होते. डेरवण येथून आल्यावर ओमकार कोलगे याने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ऋषिकेश कांबळे व राजकुमार कांबळे यांच्यावर बी एन एस एस कलम 117( 2), 352 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकाळे करीत आहेत.