महिलेवर गुन्हा दाखल
चिपळूण : गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष दाखवून यातूनच एका गुंतवणूकदाराची तब्बल 61 लाख 22 हजार 811 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना 16 ऑगस्ट ते 6 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील पागमळा परिसरात घडली.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऍन्झो कॅपिटल या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या अक्शा नामक महिलेवर चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अना नावाच्या टेलीग्राम अकाउंटवरुन अक्शा नावाची महिला ऍन्झो कॅपिटल या कंपनीसाठी फॉरेक्स ट्रेडिंगचे काम करत असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळेल, असे सांगितले. त्यासाठी व्हॉटस्अपॅवरुन ऍन्झो कॅपिटल या नावाची लिंक पाठवल्यानंतर अक्शा हिने तक्रारदार यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी आधारकार्डव्दारे या ट्रेडिंग लिंकमध्ये नोंदणी केली. त्यानंतर सुरुवातीस केलेल्या गुंतवणुकीमध्ये नफा परतावा मिळाल्याने अक्शा हिच्या सांगण्यावरुन गुंतवणूक केली गेली. ती ऍन्झो कॅपिटल या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवून तक्रारदार यांना बनावट ट्रेडिंग कपंनीची लिंक पाठवून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून 61 लाख 22 हजार 811 रुपये गुंतवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.