गुहागरातील घटनेने खळबळ
गुहागर:-तालुक्यात एका 31 वर्षीय तरुणाने आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे चिठ्ठीत लिहून ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला आत्महत्या करण्यास कोणी कोणी भाग पाडले हे त्या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले आहे. गितेश मुरटे ( 31 मूळचा राहणार मुंबई सध्या गुहागर शहरातील वरचा पाठ बाग) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, गितेश हा एका कंपनीतील पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला होता. तो वरचा पाट बाग येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान कंपनीमधील काही सहकारी गितेश मुरटे याच्या मोबाईलवर फोन करत होते. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. कंपनीतील सहकारी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेले असता घराला आतून कडी दिसून आली. सहकाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता तो पंख्याच्या हुकाला दोरखंडाने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करून त्याचा मृतदेह खाली उतरवला. यावेळी गितेश मुरटे याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्या मागील कारण लिहिले आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे, कोकण एलएनजी मधील एचआर विभागातील पॅन्ट्री मध्ये त्याच्या हाताखाली काम करणारे काही तरुणांची नावे लिहिली आहेत. असे खात्रीलायक वृत्त हाती लागले आहे.
दरम्यान गीतेश याने चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या त्या सर्वांची हजेरी घेण्यात आली.
सोमवारी सायंकाळी उशिरा गुहागर पोलीस स्थानकामध्ये त्या सर्वांची हजेरी घेण्यात आली. कोकण एलएनजी मधील या प्रकारामुळे कंपनीमधील सुरू असलेल्या त्रासाचा गौप्य स्फोट झाला आहे. आता पोलीस चौकशीत कोण कोण दोषी आढळणार आणि पोलीस त्याला ताब्यात घेणार हे लवकरच समोर येणार आहे.