खेड:- खेड-दापोली मार्गावरील दस्तुरीनजीक 15 हजार 360 रुपये किंमतीच्या विदेशी मद्यसाठयाची वाहतूक करण्यासाठी दोघांनी वापरलेली दोन लाख रुपये किंमतीची रिक्षा येथील पोलिसांनी जप्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी खेड-भरणे मार्गावरील महाडनाका येथे दोन रिक्षांसह सव्वा लाखां ऐवज जप्त केला होता. या कारवाईपाठोपाठ दुसऱ्या मोठया कारवाईने बेकायदेशीरपणे विदेशी मद्यसाठयाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
खेड-दापोली मार्गावरून मंडणगडच्या दिशेने विनापरवाना विदेशी मद्यसाठयाची वाहतूक होणार असल्याची कुणकुण लागताच पोलीस पथकाने दस्तुरीनजीक सापळा रचून सुशिल गोविंद कासारे (45, रा. भोलवली-मंडणगड), भांबू शिवराम कासारे (56, दाबट, मंडणगड) या दोघांना रंगेहाथ पकडले होते. ते बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षातून (एम.एच.08/बी.सी.-1048) विदेशी मद्यसाठयाची वाहतूक करत होते.
या रिक्षातून 180 मिली मापाच्या सीलबंद बाटल्यांची प्रत्येकी 48 नग असलेले दोन बॉक्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सोहेल ढगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. जप्त केलेला 15 हजार 360 रुपये किंमतिचा विदेशी मद्यसाठा दोघांनी नेमका आणला कुठून, या शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. पथकात पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल सोहेल ढगे, प्रकाश पवार, पोलीस शिपाई राहुल कोरे यांचा समावेश होता.