खेड:-खेड-दापोली मार्गावरील दस्तुरीनजीक मद्यासह सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त केल्यी घटना ताजी असताना या मार्गावर सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास देशी-विदेशी मद्यासह पिकअप टेंपो असा 4 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्या चालक रणजित सुरेश कडू (36, रा.चींचघर-वेताळवाडी, खेड), प्रथमेश महेंद्र मोहने (27, तिसे-मोहनेवाडी, खेड) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड-दापोली मार्गावरून महिंद्रा कंपनीच्या पिकअप टेंपोमधून विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचला. पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस हेडकॉन्स्टेबल बुरोंडकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल कोटकर यांचा समावेश होता. पिकअप मार्गावरून जात असताना पथकाने अडवून विचारणा केली. यादरम्यान, दोघांनी उडवाउडवी उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी पिकअपची झडती घेतली असता 12 हजार 600 रूपये किमतीचा सिलबंद असलेला देशी-विदेशी मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला. मद्यासह 4 लाख रुपये किंमतीचा टेंपो पोलिसांनी हस्तगत केला.