चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट तसेच कापसाळ येथे रविवारी झालेल्या दोन अपघाताप्रकरणी कंटेनर व एका कारचालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
शंभू गोपाळसिंग यादव (32, उत्तरप्रदेश) असे कंटेनरचालकाचे नाव तर रितेश मनोहर काळभोर (रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रुपेश प्रकार रहाटे (34, कापसाळ), मंगेश दिलीप कांबळे (30, पुणे) यांनी दिली आहे. तसेच अमजद ख्वॉंजा चाऊस (42, मिरज), शिल्पा मंगेश कांबळे, अमर कांबळे (दोघे-पुणे) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम घाट येथे कंटेनर चालक शंभू यादव याने ताब्यातील कंटेनर उताराने रस्त्यावर विरुद्ध बाजूने भरधाव वेगात चालवून रुपेश रहाटे याच्या दुचाकी व त्यानंतर एसटी बसला धडक दिली. यात एसटी चालक अमजद चाऊस हे गंभीर जखमी झाले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शंभू यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कापसाळ येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रितेश काळभोर याने त्याच्या ताब्यातील कारने मंगेश कांबळे यांच्या छोटया टेम्पोला धडक दिली. यात मंगेश कांबळे यांच्या वाहनासह समोरील दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात मंगेश कांबळे यांची पत्नी शिल्पा कांबळे व भाऊ अमर कांबळे यांना दुखापत झाली आहे. तसेच अन्य एका कारमधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. या अपघातप्रकरणी रितेश काळभोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.