संगमेश्वर-चिपळूण मतदार संघातील उमेदवाराकडून ग्राहकांच्या पैशाचा प्रचारासाठी वापर : उदय सामंत
रत्नागिरी:-मंत्री उदय सामंत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोट बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे, संगमेश्वर चिपळूण मतदार संघातील एका उमेदवाराच्या नातेवाईकांची एक बँक असून त्या बँकेच्या जमलेल्या पिग्मीचे पैसे उमेदवाराच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी वापरले जात आहेत. भविष्यात ही बँक अडचणीत आली तर ग्राहकांचे पिग्मीचे पैसेही बुडतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या व्यक्तव्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या विधानाचा रोख चिपळूण संगमेश्वरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्याकडे जात आहे. त्यामुळे आता प्रशांत यादव आणि कुटुंब याला उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रशांत यादव यांना चिपळूण संगमेश्वर मतदार संघात उत्तम प्रतिसाद मिळत असताना उदय सामंत यांनी केलेले हे विधान निवडणुकीसह बँक ग्राहकांच्या जीवात धडकी भरवणारे आहे. फक्त दोन ओळींच्या दिलेल्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.