रत्नागिरी:-संपूर्ण कोकणात ‘जीआय’ नोंदणीधारक १ हजार ८३९ बागायतदार असल्याची माहिती बागायतदार संघातर्फे देण्यात आली.
कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये कोकण हापूस नावाने अन्य आब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.
हापूसच्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे; मात्र ही नोदणी करण्यासाठी जीआय देणान्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत.
रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला ३ वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला जात आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही; मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळते.
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, जिल्ह्यात २० हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ हजार २५० हेक्टर क्षेत्र असून, ३४ हजार ४५० बागायतदार आहेत; मात्र, जीआय नोदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ हे जीआय मानांकन नोदणीसाठी बागायतदाराकडे पाठपुरावा करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १०० बागायतदार, २४० प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७९९ बागायतदारांनी नोंदणी केली आहे.
‘जीआय’ मानांकनासाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारा याशिवाय २६०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. नोंदणीनंतरच नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरता येतो.
जास्तीत जास्त आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हानिहाय मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यंदाही लवकरच मेळावे घेण्यात येणार आहेत. मानांकन घेण्यात हापूस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते संघाचे सचिव मुकुंद जोशी यांनी दिली.