चिपळूण:-विद्यमान आमदार शेखर निकम यांनी केलेले काम पाहता त्यांचा विजय निश्चित असून फक्त आघाडी किती हे मोजायचे बाकी आहे, असे प्रतिपादन कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ चिपळूण दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, युती सरकारच्या माध्यमातून शिक्षकांच्या बऱ्याच समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत. टप्पा अनुदान, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सुमारे ११६० कोटींचा पहिला टप्पा, लगेचच दुसरा टप्पा अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे.
यापुढेही युतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. आमदार शेखर निकम यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचा विजय निश्चित असून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अनुदानित विनाअनुदानित सगळे शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी शेखर सरांच्या नक्कीच पाठीशी राहतील, असा विश्वास वाटतो, असे श्री. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, निवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आकाराम संभाजी कोंडीगिरी, सावर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक आदी उपस्थित होते.